बुधवार, ११ जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय ७ - श्री. राजकुमार व्हटकर (आयपीएस)

श्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस) हे सध्या औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत. त्यांची 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये छापून आलेली मुलाखत येथे जशीच्या तशी देत आहे. तुम्हाला ती नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

परिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर (शब्दांकन: श्री. मनोहर भोळे)
 
दहावीत केवळ ५३ टक्के, बारवीत ७० टक्के, बी. कॉम. मध्ये ६६ टक्के, तर एमबीएमध्ये ६६ टक्के गुण. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील ही सर्वसाधारण प्रगती. बारावीपर्यंतचे शिक्षणही ग्रामीण भागात झाले. पहिली ते चौथी फलटणच्या नगरपरिषद शाळा क्रमांक दोनमध्ये. पाचवी ते दहावी येथील मुधोजी हायस्कूलमध्ये. या व्यक्तिमत्त्वाचा राजकुमार व्हटकर हा एक सामान्य विद्यार्थी ते भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी हा प्रवास तसा रोमांचक आहे. 
 
बी. कॉम. होईपर्यंत पुढे काय करायचे, हे माहीत नव्हते. ठरले नव्हते. बी.कॉम. संपत आले, मग मुले करतात म्हणून आपणही एमबीए करू म्हणत बी. कॉम.च्या शेवटच्या वर्षाला असताना एमबीएची प्रवेश परीक्षा दिली. यथावकाश भारती विद्यापीठात प्रवेशही मिळाला. पुण्यातील भारती विद्यापीठातून एमबीए पूर्ण झालेसुद्धा. आता या वेळेपर्यंत यूपीएससी म्हणजे काय असते, याची अजिबात कल्पना नव्हती. वडिलांचा घरी चामड्याचा व्यवसाय. आपल्या एमबीए ज्ञानाचा उपयोग करून आपण आधुनिक पद्धतीने या व्यवसायाचा विस्तार करू, यातच स्वतःचे करिअर करू, अशी या वेळेपर्यंतची मनाची तयारी होती; पण...
 
"तू यूपीएससी पास होऊन स्वतःची लायकी व कर्तृत्व सिद्ध कर. तुला सरकारी नोकरी करायची नसेल तर नको करू, पण तू पोस्ट मिळवू शकतोस ही बाब सिद्ध करून तर दाखव !'' या वाक्‍याने एक वादळ उठले, जे थेट आयपीएस झाल्यावरच शमले. नातलग डॉ. विजयालक्ष्मी सोनवणे यांची ही आव्हानात्मक भाषा होती. ही गोष्ट आहे १९९५ या वर्षाची.
 
एमपीएससी व यूपीएससीचा एकत्रित प्रयोग खूप कमी जण करतात. दोन्ही दगडीवर हात नको, सटकलो तर खोल दरीत कोसळू, अशी भीती मनात असते. व्हटकर यांनी मात्र हा प्रयोग यशस्वीपणे सिद्ध केला. अगदी वेगवेगळे ऑप्शनल विषय ठेवून. एमपीएससीसाठी बॅंकिंग आणि अकाऊंट्‌स तर यूपीएससीसाठी पूर्वपरीक्षेला कॉमर्स, मुख्य परीक्षेला इतिहास व मराठी वाङ्‌मय. एकूण पाच विषय ही स्वारी एकसाथ हाताळत होती.
 
डोक्‍यात या विषयाचे फ्यूजन कसे काय नाही झाले, ते यांनाच माहीत. १९९५ ला एमपीएससीतून कक्ष अधिकारी, तर १९९६ या वर्षी लेखा अधिकारी वर्ग-१ म्हणून निवडही झाली. शिवाय या दोन्ही वर्षी यूपीएससीची पूर्वपरीक्षाही पास होण्याची किमया घडली. स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे. ठरले ते ठरले. आता मागे नाही हटायचे. "लायकी सिद्ध करण्यास...' हे वाक्‍य सतत डोक्‍यात घुमायचे. पद मिळाले पाहिजे बस्स ! शेवटी इप्सित साध्य झाले. एमपीएससीतून का होईना, दोन पदे मिळाली. तसे पाहता हे आव्हान कधीच पार करून झाले होते.
 
स्वतःचे दोष हेरून त्यावर स्वतः उपाययोजना करण्याची पद्धत प्रचंड यश देऊन गेली. माणूस स्वतःच स्वतःचा उत्तम परीक्षक असतो, हा अलिखित नियमच सिद्ध झाला. या सगळ्या कष्टाची परिणती यूपीएससीची मुख्य परीक्षा पास होण्यात झाली. आत्मविश्‍वासाच्या कक्षा रुंदावल्याने क्षितिजापलीकडील यशाची चाहूल लागली. संधी हातची गेली नाही पाहिजे. पाहिजे तेवढे कष्ट करू पण सिलेक्‍शन झाले पाहिजे, या निर्धारातून दिल्लीवर आक्रमणाची मोहीम आखली गेली. ती यशस्वी झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा