बुधवार, २३ मे, २०१२

ढोर समाजाचा इतिहास

गेल्या ब्लॉग मध्ये संजय सोनवणी यांच्या '......ढोर समाजाचा इतिहास' लेखाबद्दल लिहिले होते. त्यास फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. त्यांच्या या लेखाला कॉमेंट देवून तो लेख माझ्या ब्लॉगवर टाकण्याची परवानगी मागितली होती. ती त्यांनी लगेचच देवून मनाचा मोठेपणा दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचा हा लेख लवकरच 'दैनिक नवशक्ती'मध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्यांच्या पुढील लिखाणाला हार्दिक शुभेच्छा. तो लेख पुढे दिलेला आहे :


ज्यांच्यशिवाय चालणेही अशक्य झाले असते...ढोर समाजाचा इतिहास
- संजय सोनवणी

हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज मुख्यत: महाराष्ट, कर्नाटक
अल्पांश स्वरुपात गुजरातेत आढळतो. अन्यत्र कातडी कमावणा-या समाजांना वेगवेगळी नांवे आहेत. जशी उत्तरेत मोची, चमार वगैरे. त्याचे कारण असे आहे कि ज्या ज्या भागांवर सातवाहनांनी राज्य केले तेथे तेथे माहाराष्ट्री प्राक्रुत भाषेचा प्रभाव असल्याने त्या भागांतील जातींची नांवे हे महाराष्ट्री प्राक्रुतावरुन पडलेली आहेत. अन्यत्रच्या  जातीनामांवर त्या-त्या प्रदेशातील भाषांचा प्रभाव असला तरी हा समाज मुळचा एकच. चर्मकार समाजही याच समाजातुन विशिष्ट कौशल्यामुळे वेगळा झाला एवढेच!

नामोत्पत्ती:
'ढोर' हा शब्द मुळात जनावरांसाठीचा नाही हे महाराष्ट्री प्राक्रुतावरुन स्पष्ट दिसुन येते. मुळ शब्द "डहर" असा असुन त्याचा अर्थ पानवठे, डोह, तळी यानजीक व्यवसाय करणारे लोक असा आहे. ढोर समाजाचा पुरातन कातडी कमवायचा व्यवसाय पाहता व त्यासाठी विपुल प्रमाणात पाण्याची असलेली गरज पाहता त्यांचा व्यवसाय हा मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणीच स्थिरावला असनेही सहज स्वाभाविक आहे. "डह" हा शब्द पुढे "डोह" (पाण्याचा) बनला व डोहरचे कालौघात बदललेले रुप म्हणजे "ढोर" हे होय. (आजही ग्रामीण भागात डोहाला "डव्ह वा ढव" असेच संबोधतात.) गुरे डोहांत अपरिहार्यपणे जातातच म्हणुन जातात म्हणुन गुरे-ढोरे हा शब्द प्रचलित झाला व जणु काही ढोर म्हणजे जनावरे असा चुकीचा अर्थ प्रचलित झाल्याचे स्पष्ट दिसते. यातुनच ढोर समाजाला हा शब्द अवहेलनात्मक अर्थाने वापरला गेल्याचा समज असल्याचे दिसुन येते...पण ते मुळ वास्तव नाही. डोहानिकट (वा जलाशयानिकट) व्यवसाय करणारे ते डोहर तथा ढोर होत. या समाजाचे मानवी इतिहासात अत्यंत मोलाचे स्थान आहे. या समाजाने अठराव्या शतकातील औद्योगिक क्रांतीपर्यंत पुरातन काळापासुन मानवी जीवन, युद्धशास्त्र, प्रवास व एकुणातील अर्थव्यवस्थाही सम्रुद्ध करण्यात मोलाची कामगिरी केली आहे हे पुढे सिद्ध होईलच, पण भारतीय समाजातील वैदिक व्यवस्थेने त्यांच्याबद्दल कृतज्ञ न राहता त्यांनाच अस्पृश ठरवत कृतघ्नताच व्यक्त केली आहे असे स्पष्ट दिसते.

प्राचीन इतिहास:
भारतात जाती या व्यवसायावरुन पडतात ही परंपरा आपल्याला माहितच आहे. ढोर समाजाचा  व्यवसाय म्हणजे मृत जनावरांच्या कातड्यावर प्रक्रिया करुन ते टिकावु व उपयुक्त बनवणे हा होय. हा व्यवसाय किती पुरातन आहे? मुळात मानवाने हा शोध कसा लावला यासाठी आपल्याला इतिहासात डोकावणे गरजेचे आहे. खरे तर हा जगातील पहिला जैव-रसायनी प्रक्रिया उद्योग होय.

जेंव्हा जवळपास दीड लाख वर्षांपुर्वी मानव हा शिकारी मानव होता, भटका होता, नग्न रहात होता, त्या काळात मानवाला शिकार केलेल्या प्राण्यांच्या कातड्याची उपयुक्तता लक्षात आली. थंडी-पावसापासुन रक्षण करण्यासाठी (लज्जा रक्षणासाठी नव्हे...कारण तो विचार तेंव्हा मानवाला शिवलाही नव्हता.) पांघरण्यासाठी व कृत्रिम निवारे बनवण्यासाठी आपण कातडे वापरु शकतो हे लक्षात आल्यावर मानवाने शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी जपायला सुरुवात केली. परंतु वातावरणाच्या प्रभावामुळे कातडे फार काळ टिकत नाही हे लक्षात आल्यानंतर माणसाने आपली प्रतिभा कामाला लावुन कातडे टिकावु कसे करता येईल यासाठी शोध सुरु केला. सुरुवातीची हजारो वर्ष प्रथम मानव जनावराचीच चरबी चोळुन कातड्याला मऊ व टिकावु ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्या काळी विपुल शिकार उपलब्ध असल्याने तशी कातड्याची कमतरताही नव्हती. शिवाय तत्कालीन मानव सतत शिकारीच्या वा चरावु कुरणांच्या शोधात सतत भटकता असल्याने प्रक्रिया पद्धती शोधणे वा प्रक्रिया करत बसणे यासाठी त्याच्याकडे वेळही नव्हता. पण मनुष्य जसा शेतीचा शोध लागल्यावर स्थिरावु लागला व शिकार कमी झाल्याने कातड्याची मुबलकता कमी झाली तेंव्हा मात्र कातड्यावर प्रक्रिया केली तरच कातडे दीर्घकाळ टिकावू करता येईल हे त्याच्या लक्षात आले.

सरासरी इसवी सनाच्या दहा हजार वर्षांपुर्वी, म्हणजे जेंव्हा या वैदिक धर्माचा उदयही झाला नव्हता, तेंव्हा असंख्य प्रयोग करत त्याने नैसर्गिक वनस्पतीजन्य पदार्थ वापरत अभिनव पद्धती शोधुन काढली व ती म्हणजे कातडी कमावण्याची कला. भारतात बाभुळ, खैर अशा झाडांच्या साली, चुना, मीठ व अन्य तेलादि रंजक द्रव्ये वापरत कातडी कमावण्याची, रंगवण्याची पद्धत इसवी सनापुर्वी सात हजार वर्षांपुर्वीच शोधण्यात आली. प्रचारित होवून ती भारतभर एक-दोन शतकातच देशभर पसरत वापरात आली. (युरोपात मात्र ओक वृक्षाची साल वापरली जाई व ते कातडे तेवढे टिकावुही नसे.)

कातडी कमावणे हे अत्यंत शिस्तबद्ध रासायनिक प्रक्रियांची एक विशिष्ट शृंखला असलेले किचकट व कष्टदायी काम आहे. आज या उद्योगात अनेक प्रक्रिया यांत्रिकीकरणाने होत असल्या तरी प्राथमिक प्रक्रिया या मानवी कष्टांशिवाय होत नाहीत. प्राचीन काळाचा विचार केला तर मग हे काम एके वेळीस रासायनिक प्रक्रिया वेळोवेळी करण्याची, रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी नैसर्गिक जैव सामग्री गोळा करण्याची व अंतत: त्याला अंतिम उत्पादनाचे रुप देण्याची कारागिरी करण्यास किती सायास पडत असतील याची आपण कल्पना करुनच थक्क होतो.

आता येथे कोणी प्रश्न विचारु शकतो कि मुळात ही यातायात का? एक तर जनावराचे कातडे सोलुन काढले कि ते वाहुन आपल्या उद्योगस्थळापर्यंत वाहुन नेण्याचा, वरकरणी घाण वाटणारा उपद्व्याप...मग एवढ्या रसायनी प्रक्रिया करतांना येणारा उग्र व घाणेरडा वास, चुन्याची-मीठाची प्रक्रिया करतांना हात-पायांवर होणारे परिणाम...हे सारे सहन करत का केला? दुसरा प्रश्न असा कि खुद्द गावाच्या वेशीआत हा उद्योग, अगदी समजा प्राथमिक प्रक्रिया डोह वा अन्य जलाशयांजवळ केल्या, तरी उर्वरीत प्रक्रिया वेशीआत कोणी करु देणे शक्य नव्हते, कारण तरीही वास प्रक्रिया पुर्ण झाल्याखेरीज जात नाही. त्यामुळे त्यांना आपली वसतीही आपल्या उद्योगस्थानानिकट ठेवणे भाग पडले. याचे कारण म्हणजे मुळात या व्यवसायाखेरीज मानवी जीवन सुसह्य होवूच शकत नव्हते. मग तरीही हा उद्योग यांनी सुरु का ठेवला? कारण नसतांना अस्पृशतेचा कलंक का माथी मारुन घेतला? हा उद्योग तसा जगभर असला तरी तिकडे अशी अमानवी वागणुक या उद्योगातील लोकांना दिली गेल्याचे एकही उदाहरण मिळत नाही.

या उद्योगाचे मानवी जीवनाला नेमके काय योगदान आहे हे प्रथम आपण पाहुयात, त्याशिवाय ढोर समाजाचे महत्व समजणार नाही. कातडी कमावल्यामुळे (विविध प्राण्यांची कातडी कमावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात.) घॊड्यांचे जीन, बैलगाडीसाठी बैलांच्या टिकावु व मजबुत वाद्या बनवता आल्या. सैनिकांसाठी शिरस्त्राणे, हस्त-बचावक, चामडी चिलखते, ढाली बनवता येवू लागली व युद्धतंत्रात मोठा बदल झाला. लिखित संदेश पाठवण्यासाठी व अगदी ग्रंथ लेखनासाठी कातड्याचा वापर होवू शकला. (अशा हजारो चामड्यावर लिहिलेल्या ज्यु धर्माच्या लेखनाच्या गुंडाळ्या तेल अमार्ना येथे सापडल्या आहेत.) एके काळी तर चामड्याचे तुकडे हे चलन म्हणुनही वापरात होते. यामुळेच सर्वांसाठी पादत्राणे उपलब्ध होवू शकली. शेतीसाठीच्या अनेक अवजारे ते जलस्त्रोतासाठी लागणा-या मोटी बनु लागल्या. शेती उत्पादन वाढले. फ्यशनमध्ये आजही कातडी वस्तु प्रचंड मागणीत असतात. अगदी ग्रंथांच्या बांधणीतही कातड्याचा उपयोग केला जात असे. पाण्याच्या पखाली, तेलाचे बुधले (ढोर समाजात यातही स्पेशालिस्ट असणारी पोटजात आहे व तिला "बुधलेकरी" म्हणतात.) कमावलेल्या चामड्यापासुनच बनत होते. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. पण या चर्म-वस्तुंचा सर्रास उपयोग करणा-यांनी मात्र ज्यांनी मुळात हे बनवले व ज्यांनी (चर्मकारांनी) त्यापासुन आपल्या कलेचे दर्शन घडवत मानवोपयोगी वस्तु बनवल्या, त्यांना मात्र अस्पृश ठरवले. मेलेल्या जनावराच्या चामड्याची पादत्राणे वापरतांना, मंदिरांत वा संगीतात रममाण होतांना चर्मवाद्यांचाच प्रामुख्याने वापर करतांना, अश्वारोहन करतांना त्या चामड्याच्या वाद्या हातात धरतांना, चामड्याचे कंबरपट्टे वापरतांना, कातड्याच्याच पखालींतील पाणी पितांना वा चामड्याच्याच बुधल्यांतील तेल खाण्यात वापरतांना कोणालाही शरम वाटली नाही...पण...असो.

तर हा समाज आद्य जैव-रसायनी प्रक्रियेचा शोध लावत मानवी जीवनात अत्यंत मोलाचा हातभार लावणारा, भारतीय अर्थव्यवस्थेलाही पुरातन काळापासुन हातभार लावणारा समाज आहे. उदा. सिंधु संस्कृतीतून निर्यात होणा-या मालात मीठ व कातडी वस्तुंचे व नंतर मणी-अलंकारांचे फार मोठे प्रमाण होते. ढोर समाजातुनच चर्मकार समाजाची उत्पत्ती झालेली आहे हे महाराष्ट्रीय समाजेतिहासावरुन स्पष्ट दिसुन येते. आजही भारत प्रक्रिया केलेली कातडी निर्यात करणारा जगातील तिस-या क्रमांकाचा देश आहे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. फक्त आता याच मुळ समाजाचा - ज्याने या सर्वच प्रक्रियेचा आद्य शोध लावला त्याचा स्वत:चा वाटा घटलेला आहे...कारण औद्योगिकरण व त्यासाठी लागणा-या या समाजाकडे असलेला भांडवलाचा अभाव.

१८५७ पासुन जसे याही क्षेत्रात औद्योगिकरण आले तसे मात्र क्रमश: या समाजाचे महत्व कमी होवू लागले. गांवोगांवी हिंडुन कातडी विकत घेत चर्मप्रक्रिया करणा-या कारखान्यांना पुरवणा-यांची संख्या वाढली. त्यामुळे या स्थानिक, कुटीरौद्योगावर अवकळा यायला लागली. त्यात जन्मजात अस्पृशता लादलेली असल्याने स्वातंत्र्योत्तर काळात ही मंडळी भान येवून या व्यवसायापासुन फटकुन रहायला लागली. नवे रोजगार, तेही न मिळाल्यास अगदी शेतमजुरीही करु लागली. मुळात हा समाज पुरेपुर शैव. यांच्यातही मातृसत्ता पद्धती सर्रास आहे. या समाजातच ककय्या या महान वीरशैव संताचा फार मोठा प्रभाव असुन महाराष्ट्रातीलही असंख्य समाजिय स्वत:ला कक्कय्या मानतात...किंबहुना हीच फार मोठी पोटजात बनलेली आहे. या मुळ डहर (ढोर) शैवजनांची लोकसंख्या भारतात २००१ च्या जनगणनेनुसार सुमारे ८२ हजार होती...आता ती सव्वा ते दीड लाख एवढी असेल. या समाजातुन आता अनेक विद्वान, शास्त्रज्ञ ते संगणक तज्ञ पुढे येवू लागले आहेत. राजकारणात म्हणावे तर सुशिलकुमार शिंदे व त्यांची कन्या देशप्रसिद्ध आहेतच. याचाच अर्थ असा कि या समाजाने आपला व्यवसाय जरी आधुनिकिकरणाने हिरावला असला तरी जिद्द सोडलेली नाही. खरे तर सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या समाजासाठी खुप काही करायला हवे होते अशी अपेक्षा असायला हरकत नाही...पण याचा दुसरा अर्थ असाही आहे कि त्यांनी स्वजातीयांचाच, अन्य नेते पाहतात, त्याप्रमाणे स्वार्थ पाहिला नाही.

असो. जेही पायात प्रथम बाहेर जातांना चपला-जोडे घालतात, चामडी वस्तुंचा (जसा अमेरिकन लोकांना मिंक कोट घालण्यासाठीचा महाभयंकर शौक आहे) हव्यास बाळगतात...ज्यावर आपली सभ्यता व श्रीमंती ठरवतात, त्यांनी लक्षात घ्यावे कि हे सारे उपकार डहर उर्फ ढोर समाजाचे आहेत. जेथे स्वत:ला पवित्र समजणारे ऋषि-मुनी (अगदी आजचे बाबा-बुवाही) सिंह ते म्रुगाजीनावर (याच व्यावसायिकांनी कमावलेल्या चर्मावर) बसुन जगाला उपदेश करत असत तेही याच समाजाचे ऋणी असले पाहिजेत. ते चर्म मात्र स्पर्श्य होते...आणि ते बनवणारे कलाकार-उद्योजक मात्र अस्पृश, असे कसे बरे?

मूळ लेखाची लिंक: http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_10.html

६ टिप्पण्या:

  1. Hello sir

    I Want to Know The Diffreance Between DHOR SAMAJ and CHAMBHAR SAMAJ .

    Hope you will give me you are fed-back as soon as possible .

    उत्तर द्याहटवा
  2. खूप काही समाजाची माहिती दिल्या बदल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. खूप काही समाजाची माहिती दिल्या बदल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. कातडी ज्यात भिजवुन ठेवायचे त्यास नांदाणी हा शब्दप्रयोग वापरायचे

    उत्तर द्याहटवा