शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

पत्र लिहिण्यामागचा उद्देश

परवा लिहिलेल्या ब्लॉगवरील पत्राचा उद्देश केवळ मंडळांची प्रसिद्धी, वधू-वर पुस्तिकेचा खर्च वाचवणे किंवा घरबसल्या वधू-वर यादी पाहता येणे यापुरताच मर्यादित नाही तर समाजाचा पैसा विधायक कार्यासाठी वळवणे हा आहे.

आज कितीतरी समाजबांधव शिक्षणाविना, मार्गदर्शनाअभावी योग्य प्रकारचे शिक्षण घेऊ शकत नाहीत की योग्य व्यवसाय निवडू शकत नाही. जगात घडणाऱ्या विविध संधींचा फायदा अजूनही आपला समाज घेऊ शकत नाही किंबहुना आपण या संधी शोधूच शकत नाही असे म्हणणे योग्य होईल. कारण काहीही असो त्या खोलात मला आता जायचे नाही. पण यापुढेही आपण असेच झापड लावून जगणार आहोत का? कित्येक शासकीय आणि खाजगी संस्था आर्थिक दुर्बल, पिचलेल्या समाजाला उभारी देण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत, याची आपल्याला साधी जाणीवही नाही. आजही मी, माझे कुटुंब
यापलीकडे जाऊन माझे लोक, माझा समाज यांचा विचार करू शकेल अशी आपली प्रगती झाली नाही हे मान्य करूनही, आपण कायमस्वरूपी असेच राहणार आहोत का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. ज्या समाजाला हे जमले त्यांनी स्वतःची तसेच समाजाची उन्नती केली. या संदर्भात मला रतन टाटांच्या "Building a Successful Life" विषयावर दिलेल्या व्याख्यानाच्या काही ओळी आठवतात "If you want to walk fast, walk alone. But if you want to walk far, walk together."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा