सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

अस्तित्वाची लढाई !!!

शीर्षक वाचून आश्चर्यचकित झालात ना. मनात आलेच असेल, 'ही कसली लढाई?' ही आहे आपल्या इंटरनेटवरील अस्तित्वाची. होय, आपल्या समाजाचे इंटरनेटवरील अस्तित्व फारच थोडे आहे. गुगल सारख्या सर्चइंजीनवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी मध्ये ढोर समाज (dhor samaj), अशी अक्षरे टाकल्यावर कोणत्यातरी संस्थेचे, संकेतस्थळाचे, काही व्यक्तींचे अथवा सोशल नेटवर्क साईट मधील ग्रुपचे नाव पुढ्यात सादर होते. परंतु ढोर समाजाबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही. ही खरेच खेदाची बाब आहे. मग एक अनाहूत विचार मनात येतोच, 'याच्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही. ही माहिती इंटरनेटवर टाकल्याचा काय उपयोग होणार?' हेही खरेच की, जोपर्यंत कोणतीही गरज नसते किंवा उपयोग नसतो तोपर्यंत आपले लोक काहीही करत नाही. एकमेकांना साधा फोनही करत नाहीत. 'आपल्या लोकांना दोनवेळचे खायची मारामार, या गोष्टी कोण करत बसणार.
पोट भरलेल्यांनी करायचे हे नसते धंदे आहेत. इत्यादी इत्यादी...' महार, मांग, चांभार यांच्या जातींची / समाजाची दखल विकिपीडिया सारख्या महाशब्दाकोशाने कधीच घेतली आहे, मात्र ढोर (dhor) शब्दाबद्दल अथवा समाजाबद्दल त्यामध्ये कोणतीही माहिती मिळत नाही. दुर्दैव समाजाचे. आपणच आपली जात लपवतो, तर त्याची माहिती इतरांना कशी होणार. आपली जात फक्त सरकारी ग्याझेटमध्ये दिसते. माझ्या आत्तेबहीनीला 'अशी जातच नाही. / ही अनुसूचित जात नाही.' असे सांगून बी. एड. ला प्रवेश नाकारला होता, तो ही मुंबई सारख्या ठिकाणी. (नंतर तेथील स्टाफमध्ये कोणालातरी ही जात माहित असल्याने प्रवेश मिळाला.) अशाच प्रकारचा अनुभव श्री. अरविंद खंदारे यांच्या गुजरात मधील बहिणीला आला. मला माहित नसलेल्या अनेकांनाही अशा प्रकारचा अनुभव आला असेल / माहित असेल. तेंव्हा ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या जातीबद्दल / समाजाबद्दल थोडीतरी माहिती गोळा करून इंटरनेटवर टाकावी. जेणेकरून इतरांना आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्या जातीबद्दल / समाजाबद्दल अधिक माहिती मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा